कल्याण : सेवानिवृत्तीनंतरच्या काळात अनेकजण आपल्या आवडीचा छंद जोपासून त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. बदलापुरात राहणारे आनंद पवार हे एक वृद्ध कलावंत मात्र आपल्या लाकडी कलाकुसरीतून उदरनिर्वाहासाठी ते सध्या धडपड करत आहेत.


वय वर्ष 75 असलेले आनंद पवार, हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होते. ती नोकरी करत असताना फावल्या वेळेत ते लाकडी कलाकुसरीच्या वस्तू बनवत असत. मात्र आता त्यांचा तोच छंद त्यांच्या उतारवयात जगण्याचा आधार बनला आहे. साग, शिसे, चंदन, देवनार आदी प्रकारच्या लाकडांपासून ते या वस्तू बनवतात. पटाशी, हातोडी, कानस याचा वापर करून बहुमजली जहाज, रथ, लहान-मोठी घरे, निरनिराळे पक्षी, प्राणी त्यांनी तयार केले आहेत..




मात्र आज आनंद पवार यांना ते करत असलेल्या लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंमधून आनंदापेक्षा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे हवे आहेत. बदलापुरात एका भाड्याच्या घरात मानसिकदृष्ट्या आजारी असलेला मुलगा आणि पत्नीसोबत राहणाऱ्या या वृद्ध कलावंतांने गेल्या काही वर्षात शेकडो लाकडी कलाकृती बनवल्या आहे. परंतु त्याचे योग्य मूल्य त्यांना कधी मिळालेच नाही. मात्र अर्थाजर्नासाठी त्यांना त्या कवडीमोल भावाने विकाव्या लागल्या. त्यांच्या पत्नी माया पवारही चित्रकार असूनही त्याही घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून या लाकडी कलाकृती बनवण्याच्या कामात त्यांना मदत करतात. अक्षरश: रस्त्यावर बसून त्यांनी या कलाकृती विकल्या. यात स्वाभिमान जपण्यासाठी सुरू असलेल्या या अखंड धडपडीचा योग्य तो सन्मान व्हावा, अशीच या वृद्ध कलावंतांची अपेक्षा आहे. 




हाती असलेल्या कलेचा वापर करून चार पैसे तरी संसारासाठी मिळवेत, म्हणून आनंद पवार सतत लाकडी कलाकुसरीच्या वस्तू बनवतात. लहान-मोठ्या शेकडो वस्तू त्यांच्या घरात आहेत. बदलापूर शहरात अगदी कवडीमोल भावात आतापर्यंत त्यांनी या वस्तू विकल्या आहेत. त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून मुलावर उपचार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.