मुंबई : भिवंडी शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुटला असून एकाच दिवसात तब्बल 8 ते 10 मुलांना भटका पिसाळलेला कुत्रा चावल्याची घटना भिवंडीतील अन्सार नगर, खंडूपाडा, पटेल नगर परिसरात घडली आहे . मोकाट पिसाळलेल्या या कुत्र्याने घातलेल्या हैदोस घातल्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून महापालिका व संबंधीत शासकीय यंत्रणेने या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.


हया अहमद, माहेनूर खान, अकरम इब्राहीम, हसनैन, रब्बानी, हुजैफा, अय्यब अन्सारी, यश दीपक चन्ने सह 8 ते 10 मुलांना अशी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावा घेऊन जखमी केलेल्या मुलांची नावे आहेत. ही सर्व मुलं दोन वर्षापासून तर बारा वर्षाच्या आतील वयोगटातील आहेत. यापैकी हया नामक मुलीच्या चेहऱ्यावर व माहेनूरला गळ्यावर कुत्रा चावल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. या सर्वांना आधी स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार करण्यात आले असून यातील दोन ते तीन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे सिव्हिल व मुंबईला हलवण्यात आला आहे, हया व माहेनूर याची प्रकृती अजूनही नाजूक आहे. तर इतर मुलांचा उपचार स्थानिक खासगी रुग्णालयात सुरू आहे.

एकाच दिवसात आठ ते दहा चिमुरड्यांना कुत्रा चावल्याच्या या घटनेने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून अशा भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा महापालिकेने व संबंधित शासकीय यंत्रणेने दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. स्थानिक नगरसेवकला या घटनेची कल्पना स्थानिकांनी दिली असता त्यांनी आपले हाथ झटकले असा आरोपही स्थानिक करीत आहेत. मात्र अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार करून देखील महापालिका या भटक्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार घडला आहे असा आरोप देखील नागरिक करीत आहेत.

संबंधित बातम्या :

विजय मल्ल्याची जप्त संपत्ती लिलावाद्वारे विकून कर्जाची रक्कम वसूल करा; मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय