मुंबई : राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असताना, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 11 आणि 12 जून रोजी मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावं असं आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आलं आहे.


चक्री वादळ किनारपट्टीपासून 300 किलोमीटर दूरवर असणार आहे. मात्र चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने समुद्र खवळलेला असू शकतो, असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मच्छिमारांबरोबरच किनारपट्टीलगतच्या रहिवाशांना देखील सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या काळात मुंबई आणि कोकणात पावसाच्या सरीही कोसळू शकतात, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.



राज्यात आज विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुणे, शिर्डी, सांगली, सिंधुदुर्ग, बारामती याठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून तेथे जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.


तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात हवामान विभागानं दिला आहे. शिवाय विजांच्या कडकडाटासह वादळही येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.