मुंबई :  लोकसभा निवडणुकीत आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असून 'ईव्हीएम'वर आपला विश्वास नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विषेश कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या पराभवाचं कारण, राज ठाकरे, राहुल गांधी, ईव्हीएम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विधानसभा निवडणूक अशा विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली.


लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएमवर फोडलं आहे. ईव्हीएमने आपल्याला कमी मतं दिल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबडेकरांनी दिला. माझा आधीही ईव्हीएमवर विश्वास नव्हता आणि आजही नाही. 2003 च्या निवडणुकीतही पराभवानंतर मी ईव्हीएमला दोष दिला होता. ईव्हीएमबद्दल लोकांमध्ये आजही शंका आहे, असं प्रकाश आंबेडकारंनी म्हटलं.


वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप सातत्याने होत होता. वंचितमुळे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असं बोललं जात आहे, मात्र काँग्रेसचे जे दिग्गज उमेदवार पराभूत झाले, ते 2014 निवडणुकीतही पराभूत झाले होते. 2014 निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन उमेदवार जिंकले होते. त्यामध्ये हिंगोलीत राजीव सातव आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. त्यामुळे आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला, असं म्हणता येणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.



लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतं मिळाली नाहीत


लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतं आमच्यासोबत आली नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी निवडणुकीच्या काही दिवस आधी फतवे निघाल्याने मुस्लीम मते आमच्यासोबत आली नाहीत. मात्र पुढील निवडणुकांमध्ये असं काही घडेल असं वाटत नाही, कारण मुस्लीम मतदारांनी आपला विचार बदलला आहे, असंही प्रकाश आबंडेकरांनी म्हटलं.


विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठी संधी


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारचं नव्हते. आज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची तीच परिस्थिती आहे, त्यांच्याकडेही उमेदवार नाहीत. ही राज ठाकरे यांच्यासाठी मोठी संधी आहे, हे त्यांनी ओळखलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत जी पोकळी निर्माण झाली होती त्याचा वंचितला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत हीच संधी राज ठाकरे यांना आहे. मात्र राज ठाकरेंसोबत जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकारंनी स्पष्ट केलं.