नवी मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशी इथल्या 'सामना'च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.
नवी मुंबईत तीन तरुणांनी दोन दुचाकींवरून येऊन ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. वाशीमध्ये सामनाची प्रेस आहे. या प्रेसवरच तरुणांनी हल्लाबोल केला.
तिकडे ठाण्यातील नितीन कंपनी परिसरातील सामनाच्या कार्यालयावर शाई फेकण्यात आली आहे.
मराठा मोर्चावरुन 'सामना'मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. त्याच रागातून ही दगडफेक झाल्याचं सांगितलं जात आहे. वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी सामना पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.
संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 'सामना'ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
तसंच मराठा समाजातील तरुणांनी संयम राखावा, मराठा मूक मोर्चा हा देशातच नव्हे तर जगात आदर्श ठरेल, असं नियोजन करावं, असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांनी केलं आहे.