मुंबई : 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना मंगळवारी मुंबईत घडली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या क्रोमा शूटसाठी मुंबईत सेट लावण्यात आला होता. अभिनेता सूर्या हा इथं एका दृश्याचं चित्रीकरण करत होता तेवढ्यातच सेटला आग लागली. आगीची माहिती मिळताच सेटवरील 50 ते 60 कलाकार आणि कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळं यामध्ये मोठी हानी टळली.


दरम्यान, आग का लागली याचं कारण तूर्तास हाती आलेलं नाही. आग लागली त्यावेळी या भागात अनेकजण कार्यरत होते त्यामुळं इथं एकच गोंधळ माजला. पण, लगेचच घटनास्थळाहून सर्वांना बाहेर काढण्यात आलं. आगीचं स्वरुप मोठं असल्यामुळं या भागात धुराचे लोट पसरले होते.


मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं. असं असलं तरीही चित्रपटासाठीचं संपूर्ण सेट भस्मसात झालं आहे. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात आली. ज्यानंतर सदर घटनेमागच्या मूळ कारणाचाही तपास करण्यात येणार आहे.


'तान्हाजी'.... या ऐतिहासिकपटाच्या दिग्दर्शनानंतर ओम राऊत यांनी बहुप्रतिक्षित अशा 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हाती घेतली. अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान याची नावंही चित्रपटाशी जोडली गेल्यामुळं त्याबाबतच कमालीही उत्सुकताही चाहत्यांच्या वर्गातून व्यक्त करण्यात आली. पण, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत नाही, तोच सेटला आग लागल्यामुळं एक संकटच कलाकारांपुढं उभं ठाकलं.