मोदींच्या ‘त्या’ दौऱ्यासाठी जाहिरातबाजीवर 8 कोटींची उधळपट्टी
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 10:07 AM (IST)
मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजन सोहळ्यासाठी आणि या सोहळ्याच्या जाहिरातबाजीसाठी राज्य सरकारने तब्बल 8 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राज्याच्या आकस्मितता निधीतून हा खर्च करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधिमंडळात ११ हजार कोटी रुपये खर्चाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यात कृषि पंपधारक शेतकरी, यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलतींबरोबरच पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचे या पुरवणी मागण्यांतून समोर आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपाने पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचे आयोजन केले होते. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे जलपूजन, मुंबई मेट्रो मार्ग, शिवडी-नाव्हा-शेवा प्रकल्पाचे भूमिपूजन आणि नवीन रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी आकस्मितता निधीतून आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे पुरवणी मागण्यांमधून समोर आले आहे. संबंधित बातम्या: