कल्याण : जेवण्याच्या वेळी मोबाईलवर गेम खेळत असल्याने संतापलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला खडेबोल सुनावले. त्यामुळे संतापलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील कोळगाव परिसरात घडली. दिगंबर वानखेडे असे मयत इसमाचे नाव आहे.
दिगंबर वानखेडे आपल्या कुटुंबासह डोंबिवली कोळगाव परिसरातील पाईप लाईन नजीक असलेल्या चाळीत राहत होते. काल रात्री नेहमीप्रमाणे ते दारू पिऊन घरी आले असताना त्यांनी पत्नीला जेवण देण्यास सांगितले.
यावेळी त्यांचा मुलगा मोबाईलवर गाणे ऐकत बसला होता. त्यानेही आईला जेवण देण्यासाठी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या वानखेडे यांनी मुलाला जेवणावरून बोलण्यास सुरुवात केली.
“तू जेवला होतास. मग परत काय जेवायला बसतोस.” असा प्रश्न करत, तुला नुसतं खायला लागतं, मोबाईलवर गाणं ऐकतो आणि सकाळी आठ वाजेपर्यंत झोपून राहतो, असे बोलत मुलाला रागवण्यास सुरुवात केली .त्यानंतर संतापाच्या भरात शेजारी असलेला विळा उचलण्यास गेले. मात्र, दारूच्या नशेत असल्याने ते खाली पडले, मात्र, संतापलेल्या मुलाने भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला करत मानेला, छातीला चाकूने भोसकले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिगंबर यांचा जागीच मृत्यू झाला .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात दिगंबर यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सूरु केला आहे .