मुंबई : मंत्रालयातील आत्महत्या सत्रानंतर सरकारने धास्ती घेतलेली दिसत आहे. जाग आलेल्या सरकारने सर्वसामान्यांच्या तक्रार निवारणाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सर्व सामन्यांच्या तक्रार निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचललं आहे. राज्यात झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल कार्यपद्धतीचा अवलंब करा, असा आदेश सरकारने काढला आहे. त्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वाढत्या आत्महत्यांमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने सामान्यांना भेटा, त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून त्यांना सहकार्य करा, असे निर्देश अधिकारी वर्गाला दिले आहेत.

आत्महत्या टाळण्यासाठी मंत्रालय इमारतीच्या भिंतीला जाळ्या


मंत्रालयीन अधिकाऱ्यांना रोज दुपारी 2.30 ते 3.30 ही वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी, असा आदेश देण्यात आला आहे. तर उपविभागीय आणि त्यावरील अधिकाऱ्यांनी सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस दुपारी तीन ते पाच या वेळेत नागरिकांना भेटावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भेटीच्या वेळा बाहेर बोर्डावर लावाव्यात असंही बजावण्यात आलं आहे. या आदेशाची अंमलबजावणी 18 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

'मंत्रालय की आत्महत्यालय?' असा प्रश्न उपस्थित होण्याइतक्या आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचा घटना गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात घडल्या आहेत. हीच धोक्याची घंटा लक्षात घेऊन मंत्रालयात जाळ्या बसवण्यात येत आहेत.

मंत्रालय की आत्महत्यालय?

काहीच दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असलेल्या 43 वर्षीय हर्षल सुरेश रावतेचा मृत्यू झाला.

अहमदनगरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अविनाश शेटेने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशनं मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

संबंधित बातम्या :


मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू


नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न


मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न


अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन