मुंबई : मुंबईच्या विकासासाठी 50 हजार कोटी रुपयांची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. वित्त आणि नियोजन विभागाच्या विशेष बैठकीत आज याबाबत निर्णय झाला. 15 व्या वित्त आयोगाच्या प्रतिनिधींपुढे लवकरच ही विशेष निधीची मागणी ठेवली जाणार आहे.


मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी एकूण 25 हजार कोटी रुपयांचा वाटा आयोगापुढे राज्य सरकार मागणार आहे. येत्या 24 तारखेला 15 व्या वित्त आयोगाच्या प्रतिनिधीपुढे ही मागणी केली जाणार आहे. लवकरच देशात 15 व्या वित्त आयोगाचे काम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याने ही विशेष मागणी केली आहे.

अर्थात 5 लाख कोटीच्या कर्जाकडे वाटचाल करणारी राज्य सरकारची तिजोरी, शेतकरी कर्जमाफी,  GST ची अंमलबजावणी तसंच विविध समस्यांमुळे राज्याचे आर्थिक नियोजन पार फसले आहे. हे लक्षात घेता राज्याने तब्बल 75 हजार कोटी रुपयांची केंद्राकडे मागणी करत आर्थिक मदतीसाठी झोळी पसरली आहे.