मुंबई : आरे कॉलनीत मरणपंथाला लागलेल्या नर्सरीला नवसंजीवनी देणारे अभिनेते सयाजी शिंदे यांना वनविभागाने अजब सल्ला दिला आहे. रोपं लावण्यासाठी आरे कॉलनीबाहेरुन माती आणण्यास वन खात्याने सांगितलं.
मुंबईची फुफ्फुसं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यासाठी हजारो झाडांची कत्तल होत आहे. याच आरे कॉलनीत नर्सरीला पुनरुज्जीवन देण्याचं काम सयाजी शिंदे आणि त्यांची सहकारी सामाजिक संस्था करत आहे.
या उपक्रमाबाबत वन विभाग आणि मेट्रो प्राधिकरणाने उदासीनता दाखवल्याचा आरोप होत आहे. कारण ही रोपं लावण्यासाठी सयाजी शिंदेंना इथली माती वापरण्यास विरोध करण्यात आला. या रोपवाटिकेसाठी बाहेरुन माती आणा, असा सल्ला वन विभागाने दिला.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी रोपं लावली आहेत. दुर्दैवाने गेल्या वर्षी सयाजींनी साताऱ्यात लावलेल्या 25 हजार झाडांपैकी शंभर झाडं एका व्यक्तीने तोडली होती.
मेट्रो मुंबईकरांच्या विकासासाठी धावणार, तिला नुसताच विरोध करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत आपण काय करु शकतो याचा विचार आरे कॉलनीत रोज सकाळी फिरायला येणाऱ्या मंडळींनी केला. त्यातूनच तब्बल 25 हजार रोपांच्या रोपवाटिकेची संकल्पना जन्माला आली.
आरे कॉलनीत नर्सरीच्या जागेवर गर्दुल्ल्यांनी अतिक्रमण केलं होतं. दारुच्या बाटल्यांचा खच पडला होता. मात्र आता तिथे नंदनवन फुलत आहे. नव्या नर्सरीचा हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात असला तरी वनविभाग आणि मेट्रो प्राधिकरणानं उदासीनता दाखवल्याची खंत सयाजी शिंदेंनी बोलून दाखवली.