मुंबई : मुंबईतल्या गणेश मंडळांच्या पाठीशी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष ठामपणे उभा राहिला आहे. गिरगावातील गणेश मंडळांना बिनदिक्कत गणेशोत्सव साजरा करण्याचा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.
गणेश मंडळांनी बिनधास्त गणेशोत्सव साजरा करावा. काही अडचणी आल्या तर आम्ही कायदेशीर मार्गदर्शन करु, असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं आहे. गिरगावमधल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक झाली.
दरवेळी आमचे (हिंदू) सण आले की बंधनांच्या गोष्टी कशा काय सुरु होतात ? कोर्ट नेमकं आमच्या सणांच्या वेळेस आदेश कसं काय देतं ? इरवी मशिदींमध्ये बांग देण्याची स्पर्धा सुरु असते तेव्हा आक्षेप का नाही ? असे सवालही यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केले.
अजानची बांग देताना लाऊडस्पीकर कशाला हवा? असा प्रश्न राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात विचारला होता. अजान कोणाला सांगायचं आहे? नमाज घरामध्ये वाचा, रस्ते कशाला अडवता? असं भाष्यही राज यांनी केलं होतं.