मुंबई : निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संपत्ती किती हे आता वर्तमानपत्रातून कळणार आहे. लोकप्रतिनिधीची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णयच आता निवडणूक आयोगानं घेतला आहे.

यंदाच्या निवडणुकीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. फक्त वृत्तपत्रातूनच नाही तर निवडणुकीवेळी बुथजवळ कटआऊट आणि बॅनर्स लावून उमेदवाराची संपत्ती जाहीर केली जाणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ही माहिती दिली आहे. यात स्थावर मालमत्तेसोबत अन्य मालमत्तेचाही उल्लेख असेल. त्यामुळे आपला उमेदवार करोडपती की रोडपती हे सर्वसामान्य मतदारांना कळू शकेल.

इतकंच नाही निवडणूकीत पाण्यासारखा वारेमाप पैसा ओतणाऱ्या उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत 15 आयकर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. विशेष म्हणजे, पक्ष किंवा उमेदवारांचा नातेवाईक जेवढा पैसे खर्च करेल, तो खर्चही उमेदवाराच्या खर्चात मोजला जाणार आहे.