गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त लाभला आहे. रविवार, 16 जून रोजी सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह अयोध्येला जाणार असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच हा शपथविधी होण्याची चिन्हं आहेत.
पवारांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, आपण युतीतच लढणार, उद्धव ठाकरेंची शेलकी टीका
रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेत नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय संजय कुटे, परिणय फुके यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे.
या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हं
1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
2. डॉ. संजय कुटे (भाजप)
3. डॉ. अनिल बोंडे (भाजप)
4. अतुल सावे (भाजप)
5. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
6. आशिष शेलार (भाजप)
तिघा विद्यमान मंत्र्यांना डच्चू
मंत्रिमंडळ विस्तारात विद्यमान मंत्र्यापैकी तिघांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्या ठाकूर आणि प्रविण पोटे यांच्यासह आणखी एका मंत्र्याला डच्चू मिळण्याची चिन्हं आहेत.
VIDEO | पक्षांतर्गत कलह टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारलं?
उपमुख्यमंत्रिपदावर पाणी
दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत ही माहिती मिळाली.
उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केली. तसेच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं होतं.
यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादं मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावं आघाडीवर आहेत. तर दादाजी भुसे आणि संजय राठोड यांचीही नावं चर्चेत आहेत.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत होते, तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांच्या निवडीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा सुरु होती.