ST Workers Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर झालेल्या आक्रमक आंदोलन प्रकरणातील आरोपी संदीप गोडबोले याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी गोडबोले याला किल्ला कोर्टात आज हजर केले होते. 


संदीप गोडबोले याला मुंबई पोलिसांनी नागपूरमधून अटक केली होती. गोडबोले आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आज कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी आरोपीकडून त्याचा मोबाइल फोन ताब्यात घ्यायचा असल्याचे सरकारी वकीलांनी म्हटले. आरोपी अॅड. सदावर्ते यांच्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप कॉल आणि मेसेज होते. हे फोन नागपूरला करण्यात आले. याचा तपास करताना आरोपीचे नाव समोर आले होते, असे सरकारी वकिलांनी म्हटले. 


सरकारी वकिलांनी म्हटले की,  मुख्य आरोपी आणि या आरोपीचे संभाषण पोलिसांना मिळाले आहे. सीसीटीव्ही फूटेजही मिळाले असून दोन्ही आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 


आरोपी संदीप गोडबोले हा एसटी कर्मचारी नसून सदावर्ते यांच्यासोबत असणारी व्यक्ती आहे. त्याने एलएलएमचे शिक्षण घेतले असून वकिलीची सनद घेतली नसल्याचेही समोर आले. दरम्यान, मुख्य आरोपी असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 


आरोपीने काय म्हटले?


आरोपी संदीप गोडबोले याने कोर्टाला सांगितले की, आझाद मैदानात जल्लोष पाहून मी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आमदार निवासला माघारी गेलो. रात्री तेथे थांबून दुसऱ्या दिवशी मैदानात आलो. सदावर्ते यांनी मोबाइल फोन कॉल उचलला नाही. म्हणून व्हॉट्स अॅप कॉल केला असल्याचे कोर्टाला सांगितले.


आरोपीची बाजू मांडण्यासाठी वकीलच नाही


आरोपी संदीप गोडबोलेकडे बाजू मांडण्यासाठी वकील नव्हता. त्यावर माझ्याकडे वकील करण्यासाठी पैसे नसल्याचा मुद्दा आरोपी गोडबोलेने मांडला. न्यायलयाने वकील हवा का अशी विचारणा केली होती.