मुंबई : शिवसेना-भाजप जागावाटपाच्या तिढ्यामुळे कोंडीत सापडलेल्या बंडखोर आमदारांची खदखद उघड होऊ लागली आहे. राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी एखादा राजकीय पक्ष पाठीशी लागतो. त्यासाठी मी पाठिंबा मागतोय, असं वडाळ्याचे बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटलं आहे.


नायगवात माझी ताकद आहे, जनता माझ्या पाठीशी आहे. मी कोणाला आजमावत नाही, पण वेळ आली तर ताकद दाखवेन एवढं नक्की, असं म्हणत त्यांनी शिवसेना-भाजपला अप्रत्यक्ष अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे.


दहा वर्ष मी काँग्रेसमध्ये राहून माझं एकही काम झालं नाही. म्हणून माझी नाराजी पक्षावर आहे, वैयक्तिक कोणावरही नाही. मी दीड वर्षापूर्वीच सांगितलंय की, विकास कामांसाठी मी देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा देणार. मी निवडणुकीला पाठिंबा जाहीर केलेला नाही, असं कोळंबकरांनी स्पष्ट केलं.



काँग्रेसचे आणखी आमदार बाहेर पडतील 


काँग्रेसचे इतरही आमदार बाहेर पडतील आणि भाजपात जातील एवढं नक्की, फक्त त्यांची नावं विचारू नका. माझ्या जागेच्या पेचाबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकीत युतीसाठी मी काम केलं आहे. मला फक्त शेवटचे सहा दिवस मिळाले. मला जर मुख्यमंत्र्यांनी आधीच आदेश दिले असते, तर मी माझ्या मतदारसंघातून यापेक्षा जास्त लीड दिला असता, असा विश्वास कोळंबकरांनी व्यक्त केला.


1990 पासून मी आमदार आहे. 1985 ला नगरसेवक झालो, तेव्हा 10 जणांचं डिपॉजिट जप्त केलं. माझी नायगावात ताकद आहे. राजकारणात अस्तित्व टिकण्यासाठी एखादा राजकीय पक्ष पाठीशी लागतो, फक्त त्यासाठी मी पाठिंबा मागतोय. मी कोणाला आजमावत नाही, पण ताकद दाखवेन एवढं नक्की, असा अप्रत्यक्ष इशाराही कोळंबकरांनी यावेळी शिवसेना-भाजप युतीला दिला.


कोंडी सगळ्यांचीच होते आहे. आता निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे. फरक इतकाच की काँग्रेसमध्ये दिल्लीला जावं लागायचं, युतीमध्ये इथेच प्रश्न मांडता येतात, असंही कोळंबकरांनी म्हटलं.


काय आहे विधानसभेच्या जागावाटपांचा पेच?


2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 122 आमदार निवडून आले. तर एकूण 6 अपक्ष आणि 1 रासप असे एकूण 129 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. येत्या विधानसभेत 135 पैकी भाजप 129 जागा लढणार असल्यास नव्याने पक्षप्रवेश करणाऱ्या आमदारांना उर्वरित 6 जागाच भाजप सोडू शकते. त्यातही काही जागा या पारंपरिक शिवसेनेच्या असल्याने शिवसेनेकडून याबाबत अध्याप कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील बंडखोर आमदार राजीनामा द्यायला तयार नसून भाजपातील पक्षप्रवेश लांबणीवर पडण्याचे चिन्ह आहेत.


काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा वडाळा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे शिवसेना नव्याने भाजपमध्ये आलेल्यांसाठी जागा सोडणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.