मुंबई : अभिनेता सोनू सूदने आता एक नवीन 'उड्डाण' घेतलं आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटाच्या काळात लाखो कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे घरी पोहोचण्यास मदत करणार्या सोनू सूदची देश-विदेशात बरीच वाहवा आणि प्रशंसा झाली. आता विमान कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदच्या कामाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला आहे.
डोमेस्टिक एव्हिएशन कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदला सलाम करताना त्यांच्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे चित्र काढले आहे. या चित्रासह सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ लिहिलेली आहे. 'ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद' म्हणजे ' मसिहा सोनू सूदला सलाम.'
एबीपी न्यूजने सोनू सूद यांच्याशी या नव्या गौरवाबद्दल संपर्क साधला तेव्हा सोनूने स्पाईस जेटकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल खूप आनंद झाल्याचं म्हटलं. एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सोनू म्हणाला की, "हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला आठवण झाली की जेव्हा मी प्रथमच मुंबईत आलो तेव्हा मी येथे अनारक्षित तिकीट काढून आलो होतो. आता स्पाईस जेटने जो सन्मान केला, त्याचा मला खुप आनंद आहे. या गोष्टीचा मला अभिमानही वाटतो आहे. मला किती चांगलं वाटतंय हे मी शब्दात सांगू शकत नाही. सोनू पुढे म्हणाला की, "बर्याच लोकांचे आशीर्वाद आहेत, विशेषत: लॉकडाऊन दरम्यान जे मला भेटले त्यांचे. त्यांच्या प्रार्थनांमुळे मला हे सगळं मिळत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोना साथीच्या काळात सोनू सूदने देशभरात अडकलेल्या अनेक गरीब लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी केवळ मदत केली नाही तर जगभरातील उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत केली होती. यासह, सोनूने साथीच्या काळात कार्यरत सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगारांना देखील खुप मदत केली.