मुंबई : राज्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 डिसेंबरची डेडलाईन निश्चित केली आहे. तब्बल 97 हजार किलोमीटर मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी विभागाने मंत्रालयातच वॉर रुमची स्थापना केली आहे.


दररोज किती किमी मार्गावरचे खड्डे बुजवले गेले, याचा आढावा घेतला जात आहे. खड्डे बुजवण्यासाठी वॉर रुमच्या माध्यमातून जिल्हानिहाय कामांवर लक्ष ठेवले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटर हँडलवरुन #PatholeMuktMaha हॅशटॅग वापरुन खड्डे बुजवलेल्या रस्त्यांचे फोटोही शेअर केले जात आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वॉर रुमची वैशिष्ट्य :

  • दररोज किती किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त झाले, याचा आढावा

  • गूगलच्या सहाय्याने अपडेट

  • प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य रस्ते खड्डे मुक्त करण्यावर विशेष लक्ष

  • सर्व विभागातील मुख्य अभियंत्यांना विशेष निधी आणि अधिकार

  • अगदी कंत्राटदाराकडून असहकार्य झाल्यास डांबरही विकत घेण्याचे अधिकार

  • खड्डेमुक्त मोहिमेत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्राकडे विशेष लक्ष

  • मंत्रालयातील 16 विविध अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवण्याचे आदेश

  • सार्वजनिक बांधकाम मंत्री पुढील काही दिवस जिल्हानिहाय दौरा करणार

  • राजकीय कार्यक्रम घेणार नाहीत, फक्त खड्डे बुजवण्याबाबत अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार

  • मंत्र्यांच्या सर्व OSD (विशेष कार्यकारी अधिकारी), खासगी सचिव यांच्याकडे खड्डे बुजवण्याच्या मोहिमेत विभागानुसार समन्वयाची जवाबदारी


15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र

खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी चंद्रकांत पाटील यांनी नवी डेडलाईन जाहीर केली आहे. 15 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी केला आहे.