मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीसाठी आता राजस्थान पोलिसांचे स्पेशल युनिट मुंबईत दाखल झाले आहे. या आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. या गुन्ह्यात आरोपींनी रेकीसाठी अनेकदा दुचाकी वापरली होती. तसेच घराचे भाड्यासाठी लागणारे पैसे यांची जमवा जमव धर्मराज कश्यप याने केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपी शिवकुमार, धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंग हे तिघेही नियमीत अंमली पदार्थाचे सेवन करायचे. मुंबईत आल्यावर हे तिघे कुर्ल्यातून नशेसाठी लागणारे अंमली पदार्थ विकत घ्यायचे अशी माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर आली आहे. 


पुण्यातून आणखी दोघांना अटक; हल्लेखोरांच्या रूममध्येच मुक्काम


पुण्यातील वारजे (Warje, Pune) परिसरात असलेल्या रूममधून गुल्लू आणि मोनु या दोन जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आणखी २ जण धर्मराज, गुरमेल आणि शिवकुमार यांच्यासोबत राहत होते. सिद्दीकी यांची हत्या करणारे 3 तरुण हे वारजे परिसरातील बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये काम करत होते. हरीष नावाच्या ठेकेदाराने या सगळ्यांना एक रूम भाड्याने करून दिली होती. याच परिसरात असलेल्या या रूममध्ये हे 5 जण राहत होते. गुल्लू आणि मोनु यांचा काही या प्रकरणी काही सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Crime News) 


बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली?


बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलीस आणि राजकारणी लोकांची दिशाभूल का करत आहेत? लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॉन्ट्रॅक्ट किलिंग घडवून आणले हे खरे आहे. पण ते कोणाच्या सांगण्यावरून केले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती केला आहे.


ॲड. आंबेडकर यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ही राजकीय हत्या होती का? पोलीस कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत? लॉरेन्स बिश्नोईचे लक्ष वेधण्यासाठी बाबा सिद्दीकी यांनी कोणत्या काळ्या हरणाची शिकार केली? बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी महाराष्ट्र सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे म्हणत हल्ला चढवला होता. त्यांनी सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली होती.