मुंबई : गौरी विसर्जनानंतर मुंबईत गणपतीच्या दर्शनासाठी फिरणाऱ्या भक्ताच्या संख्येत वाढ होताना दिसते. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रात्रकालीन विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने अनंतचतुर्दशी म्हणजेच 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान आठ लोकल फेऱ्या चालवण्याची घोषणा केली.


गणेशोत्सवात मध्य रेल्वेतर्फे 18 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सीएसएमटी ते कल्याण मार्गावर विशेष लोकल धावणार आहे. ही लोकल सीएसएमटीहून मध्यरात्री एक वाजून 30 मिनिटांनी सुटेल. कल्याण स्थानकात मध्यरात्री तीन वाजता पोहचेल. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबेल, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेटहून विरारकडे जाणारी पहिली विशेष लोकल अनंत चतुर्दशीच्या रात्री एक वाजून 15 मिनिटांनी सुटेल. दुसरी विशेष लोकल एक वाजून 55 मिनिटे, तिसरी विशेष लोकल दोन वाजून 25 मिनिटे आणि शेवटची विशेष लोकल तीन वाजून 30 मिनिटांनी सुटेल. मध्य रेल्वेच्या रात्रकालीन विशेष लोकलमुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या भक्तांना दिलासा मिळेल.

अनंत चतुर्दशीच्या रात्री (रविवार 23 -सोमवार 24 सप्टेंबर) विशेष लोकल :

चर्चगेट ते विरार : 1:15, 1:55, 2:25, 3:30
विरार ते चर्चगेट : 00:15, 00:45, 1:40, 3:15

भक्तांच्या सोयीसाठी येत्या रविवारी (23 सप्टेंबर) म्हणजेच अनंतचतुर्दशीला मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.