मुंबई : मुंबई-पुणे किंवा मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून नाशिक आणि पुणे प्रवासासाठी विशेष लोकल ट्रेन तयार करण्यात आल्या आहेत. खासकरून घाटात धावण्यासाठी बनवलेली ही लोकल मुंबईत दाखल झाली आहे.



चेन्नईच्या इंटिग्रेल कोच फॅक्टरीमध्ये ही लोकल बनवण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लोकलबाबत सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या.


कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते नाशिक या स्थानकांमधील घाटात धावण्यासाठी ही खास लोकल तयार करण्यात आली आहे. अधिकची क्षमता, शक्ती आणि ब्रेकिंग पॉवर या लोकलमध्ये देण्यात आली आहे. बंबर्डीयर लोकलमध्ये जिथे 16 ब्रेक असतात, या लोकलमध्ये 32 ब्रेक असणार आहेत.


तसेच घाटातील चढ-उतार लक्षात घेत तसं तंत्रज्ञान या लोकलमध्ये बसवण्यात आलं आहे. सध्या मुंबईमध्ये असलेल्या या लोकलवर कारशेडमध्ये काही बदल आणि चाचण्या केल्या जातील. त्यानंतर आरडीएसओ आणि मध्य रेल्वेचे अधिकारी मिळून या लोकलची घाटात चाचणी घेतील. ही चाचणी यशस्वी झाली तर येणाऱ्या काळात कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते नाशिक घाटात देखील लोकल धावू शकणार आहे.