कल्याण : इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास उल्हासनगरमध्ये घडली. या घटनेत आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.


उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरात इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ मेमसाब नावाची रहिवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर डॉ. रिझवानी यांचा दवाखाना आहे. आज दुपारच्या सुमारास अचानक दवाखान्याच्या वरच्या दोन मजल्यांचा स्लॅब दवाखान्यात कोसळला. ही घटना घडली त्यावेळी दवाखान्यात काही रुग्णही उपस्थित होते. या रुग्णांसह एकूण सात ते आठ जण या घटनेत जखमी झाले.


जखमींना तातडीनं उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं.


यावेळी ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले, ज्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. 35 वर्षीय अनंता मौर्या, 5 वर्षीय प्रिया मौर्या आणि अन्य एक अनोळखी महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.



या घटनेनंतर सुरक्षात्मक उपयोजना म्हणून ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. ही इमारत अंदाजे 26 वर्ष जुनी असून महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत तिचा समावेश नव्हता. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर टाईल्स बदलण्याचं काम सुरू होतं, त्यामुळेच ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता असून या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत महापालिकेनं दिले आहेत.