डोबिंवली : शॉर्टकटच्या नादात दोन वर्षीय चिमुकल्यासह तिघांचा बळी गेल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीच्या कोपर रेल्वे स्थानकात आज दुपारी झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.


सुनीता भंगाळे, प्रीती राणे आणि दोन वर्षांचा लिवेश राणे अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावं आहेत. कोपर परिसरात लेवा पाटील समाजाचं स्नेहसंमेलन असल्यानं कल्याणच्या कोळसेवाडीत राहणारी प्रीती राणे मुलगा लिवेशला घेऊन डोंबिवलीत आली होती. तिथे मावशी सुनीता भंगाळे यांनी घरी चलण्याचा आग्रह केल्यानं प्रीती, लिवेश आणि प्रितीचे सासरे भास्कर राणे हे तिघे कोपर पश्चिमेकडून कोपर पूर्वेला यायला निघाले.



मात्र पुलावरून जाण्याऐवजी त्यांनी शॉर्टकटचा पर्याय स्वीकारत रेल्वे रूळ ओलांडत जायचं ठरवलं. पण रेल्वे रूळ ओलांडत असतानाच अचानक एकीकडून कल्याणकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस, तर दुसरीकडून मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल आली. यामुळे भांबावलेले हे चौघेही दोन रुळांच्या मध्ये उभे राहिले. पण बाजूने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये सुनीता भंगाळे यांचा पदर अडकला आणि त्या गाडीखाली ओढल्या गेल्या.

त्यांच्यासोबत प्रीती आणि चिमुकला लिवेशही ओढला गेला आणि तिघांचाही करूण अंत झाला. तर सासरे भास्कर राणे हे मात्र यात किरकोळ जखमी झालेत. या घटनेनं राणे कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

दरम्यान, कोपर रेल्वे स्थानकात प्रवासी सर्रासपणे रेल्वे रुळ ओलांडत असूनही रेल्वे पोलीस मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत उभे असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे येथील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे रेल्वे प्रशासनानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे.