मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे 5 वेळा खासदार राहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. सर्वसामान्यांचे नेते आणि लालबाग-परळ ब्रँड अशी मोहन रावले यांची ओळख होती.


शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. मोहन रावले यांच्यावर आज रात्री किंवा उद्या सकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. आज रात्री मोहन रावले यांचं पार्थिव गोव्याहून मुंबईत आणलं जाणार आहे.


लालबाग-परळमधील लोकप्रिय नेते असणाऱ्या मोहन रावले यांची लालबाग-परळ ब्रँड अशी ओळख होती. लालबाग परळमध्ये वाढलेले मोहन रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. शिवसेनेकडून 5 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. क्रिकेटची आवड असणारे मोहन रावले क्रिकेटमध्ये करिअर करु असणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे.  ते क्रिकेटचे सामनेही भरवत असतं.


लालबाग-परळमध्ये पक्षवाढीचं कामही त्यांनी केलं असून या भागांत शिवसेना रुजवण्याच्या कामा मोहन रावले यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पक्षासाठी मोलाचं योगदान देताना अनेक शिवसैनिकही घडवले. शिवसेनाचा खंदा कार्यकर्ता गेल्यामुळे शिवसेनेत शोककळा पाहायला मिळत आहे.


शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते : संजय राऊत


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे की, "मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. "परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली..."