मुंबई : संपूर्ण मुंबईमध्ये 22 आणि 23 डिसेंबर रोजी पाणी कपात होणार आहे. घाटकोपर आणि कुर्ल्यातील काही भागांत पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंदच ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपुन वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.


येत्या 22 आणि 23 डिसेंबरला संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचं महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केलं आहे. घाटकोपर आणि कुर्ल्यातील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामामुळे 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 दरम्यान 24 तासांसाठी मुंबईत 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.


मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या 2750 मिलीमीटर व्यासाच्या उर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल (ARVC) ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटच्या दुरुस्तीचे काम 22 डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच 22 डिसेंबर रोजी एन विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा 1 ला पाणीपुरवठा करणाऱ्या 1400 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील 1400 मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे. हे काम मंगळवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे खालील नमूद भागांमध्ये मंगळवार, 22 डिसेंबर रोजी पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के कपात करण्यात येईल.


पाहा व्हिडीओ : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत 22-23 डिसेंबरला पाणीकपात



तर एन आणि एल विभागातील (घाटकोपर व कुर्ला) काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती (पाणीपुरवठा क्षेत्र, विभाग व पाणीकपातीचे प्रमाण या क्रमाने) पुढीलप्रमाणे :


1. शहर : ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण - 15 टक्के


2. पश्चिम उपनगरे : संपूर्ण पश्चिम उपनगरे (एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण) - 15 टक्के


3. पूर्व उपनगरे : एल, एन, एस - 15 टक्के


4. एन विभाग – प्रभाग क्रमांक 123, 124, 126, 127, 128, 130 मधील आनंदगड, शंकर मंदीर, राम नगर, हनुमान मंदीर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी (वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर 2, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर 1, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक 2, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी - पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.


5. एल विभाग – प्रभाग क्रमांक 156, 158, 159, 160, 161, 164 मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी - पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.


मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्यााचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.