मुंबई : मागासवर्ग आयोग मराठा आरक्षणाचा अहवाल आज सरकारसमोर सादर करणार आहे. मात्र त्याआधीच अहवालातील काही महत्त्वाच्या बाबी 'एबीपी माझा' हाती लागल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वच समाजाचा मोठा पाठिंबा असल्याचं आतून समोर आलं आहे.
सर्वांचाच मराठा आरक्षणाला पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं की नाही याबाबत सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांची मतं विचारली होती. त्यामध्ये सर्वच जातीमधील लोकांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे.
- 98.30 % मराठा समाजातील लोक म्हणतात आरक्षण मिळावं
- 89.56 % कुणबी म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळावं
- 90.83 % ओबीसी म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळावं
- 89.39 % इतर जातीय म्हणतात मराठ्यांना आरक्षण मिळावं
नक्की कोणतं आरक्षण हवं?
मराठा समाजातील लोकांना प्रश्न विचारण्यात आला की त्यांना नक्की कोणतं आरक्षण हवं आहे? 20.94 टक्के लोकांनी नोकरी, 12 टक्के लोकांनी शिक्षणात आणि 61.78 टक्के लोकांना मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी या दोन्हीत आरक्षण हवं असल्याचं म्हटलं आहे.
मराठा समाजाच्या लोकसंख्येबद्दलच्या बाबी
मराठा समाजापैकी 74.4 टक्के लोक शहरी भागात, तर 68.2 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. याचाच अर्थ नोकरीच्या, कामधंद्याच्या निमित्ताने मराठा समाजाला गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात शहरांकडे स्थलांतर करावं लागलं आहे. शहरात माथाडी, हमाल, डबेवाला अशी कामे या समाजालाही करावी लागतात, असं अनेक सर्वेक्षणातून पुढे आलं आहे.
गेल्या 10 वर्षात मराठा समाजात अनेकांच्या आत्महत्या
गेल्या दहा वर्षात 43,629 कुटुंबापैकी 345 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी 277 जण मराठा समाजातील असल्याची बाब सर्वेक्षणातून उघड झाली आहे. यातून सामाजिक परिस्थितीची जाणीव होते.
आर्थिक मागासलेपणाचे निकष
दारिद्रयरेषेखालील लोकांची संख्या 25 टक्के असावी. मराठा समाजातील 37.28 टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत.
कच्ची घरं असलेल्यांची संख्या 30 टक्क्यांहून अधिक असावी. मराठा समाजातील तब्बल 70.56 टक्के लोकांची कच्ची घरं आहेत.
अल्पभूधारक लोकांची संध्या 48.25 असावी. मराठा समाजात अल्पभूधारक लोकांची संख्या 62.78 टक्के आहे.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षणाचा अहवाल आज सादर होणार
मराठा आरक्षणाबाबत या महिन्यातच वैधानिक कार्यवाही पूर्ण करणार : मुख्यमंत्री
मराठा समाजाच्या अभ्यासानंतर 25 पैकी 21.5 गुण, स्वतंत्र आरक्षण मिळण्याची शक्यता