मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. उमेदरांची चाचपणीही सुरु झाली आहे. यातच काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याची शक्यता समोर येत आहे.
राज्यात 2019 सत्तातंर झाल्यास आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असू शकतात. त्यामुळे अशोक चव्हाण लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसचा चेहरा अशोक चव्हाण असू शकतात, हे हळूहळू स्पष्ट होत आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या. ज्यामध्ये अशोक चव्हाण यांचाही समावेश होता.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आजपासून 17 तारखेपर्यंत तीन दिवस बैठक सत्राला सुरुवात होत आहे. मुंबईतील टिळक भवन या पक्ष मुख्यालयात बैठकीचं आयोजन कऱण्यात आलं आहे.
या बैठकीत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आज मराठवाडा विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाची चाचपणी होणार आहे.