कल्याण : कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वे रविवारी विशेष ब्लॉक घेणार आहे. सहा तासांचा विशेष ब्लॉक घेऊन मध्य रेल्वे हा पत्री पूल पाडणार आहे. 22 ऑगस्टपासून कल्याणमधील धोकादायक पत्री पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 पर्यंत कल्याण स्थानकात येणारी-जाणारी सर्व वाहतूक राहणार बंद आहे. या काळात अप-डाउन मार्गावरील फास्ट-स्लो लोकल, एक्सप्रेस सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. या विशेष ब्लॉकसाठी मध्य रेल्वेला रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे.

विशेष ब्लॉकमुळे काय परिणाम?


  • 14 इंटरसिटी एक्सप्रेस (7 अप 7 डाउन) रद्द करणार

  • 15 मेल एक्सप्रेस डायव्हर्ट केल्या जाणार

  • 4 एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट करणार

  • 8 एक्सप्रेसच्या वेळा बदलणार

  • मध्य रेल्वेच्या 170 लोकल गाड्या रद्द करणार

  • सीएसएमटी-डोंबिवली, सीएसएमटी-ठाणे, कसारा-कल्याण, कर्जत-कल्याण अशा 120 विशेष लोकल चालवणार.


दरम्यान मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर 20 जुलै रोजी पत्री पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. आयआयटी मुंबई, केडीएमसी आणि रेल्वेने केलेल्या या ऑडिटमध्ये 104 वर्ष जुना असलेला पत्री पूल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि 22 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पत्री पूल बंद करण्यात आला होता.