विश्वविक्रम! सोलर लॅम्पच्या प्रकाशाने IIT मुंबई उजळली
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2018 11:19 PM (IST)
मुंबई आयआयटीच्या 'स्टुडंट सोलर अॅम्बेसेडर वर्कशॉर्प'ला देशभरातून प्रतिसाद मिळाला असून, आज गांधी जयंतीनिमित्त हा वर्कशॉप मुंबई आयआयटीने आयोजित केला होता.
मुंबई : मुंबई आयआयटीने आयोजित केलेल्या 'स्टुडंट सोलर अॅम्बेसेडर वर्कशॉर्प'मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमाची नोंद केली. सोलर लॅम्प वर्कशॉपमधून 1 लाख पेक्षा जास्त सोलार लॅम्प तयार करुन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या वर्कशॉपसाठी मुंबई आयआयटी संस्थेत 120 शाळांचे 5,700 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई आयआयटीच्या 'स्टुडंट सोलर अॅम्बेसेडर वर्कशॉर्प'ला देशभरातून प्रतिसाद मिळाला असून, आज गांधी जयंतीनिमित्त हा वर्कशॉप मुंबई आयआयटीने आयोजित केला होता. सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या या वर्कशॉपमध्ये देशभरातून 850 शाळांच्या 1 लाख 25 हजार विद्यार्थी देशभरातून वेगवेगळ्या केंद्रातून सहभागी झाले. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेचा महत्व कळावं, सौर ऊर्जेचा वापर कसा किफायतशीर करता येईल हे विद्यार्थ्यांना यातून समजावं, यासाठी हा अनोखा उपक्रम आपण देशभरात करत असल्याचं आयआयटी मुंबईचे प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी सांगितले. तर या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी अभ्यास मंडळ आणि आयआयटी मुंबईशी चर्चा करुन सोलर ऊर्जेचे हे लॅम्प तयार करण्याचे 8 वी, 9 वीच्या अभ्यासक्रमात कसे करता येईल, याचा विचार आम्ही करत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. पाहा व्हिडीओ :