विलेपार्ल्यातील शिवसागर हॉटेलच्या मागील भागात दीक्षित रोडवर असलेल्या विहिरीत ही दुर्घटना घडली. कुंकूवाडी भागात राहणाऱ्या विश्वकर्मा समाजातील महिला पूजेसाठी विहिरीजवळ असलेल्या देवळात गेल्या होत्या. पूजेनंतर महिला विहिरीजवळ बसल्या असताना संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्लॅब तुटला आणि 12 महिला आणि दोन चिमुकले विहिरीत पडले.
उपस्थितांनी तात्काळ साड्या, ओढण्या यांच्या मदतीने काही महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन, पोलिस यांना स्थानिकांनी बचावकार्यात मदत केली. विहिरीतून तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाणी उपसल्यानंतर बचावकार्य थांबवण्यात आलं. तीन वर्षीय दिव्या चंद्रेश यादव, 25 वर्षीय रेणू बुद्धू यादव आणि 55 वर्षीय जमुरत बुद्धू यादव यांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले.
काय आहे विश्वकर्मा समाजातील पूजा?
मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उत्तर प्रदेशातील विश्वकर्मा समाजातील माता ही पूजा करतात. ही पूजा दिवसभर निर्जळ राहून केली जाते. या पूजेचा विहिरीशी थेट संबंध नाही. संबंधित महिला पूजेसाठी जवळच्या देवळात गेल्या असाव्यात, त्यानंतर विहिरीपाशी बसल्या असाव्यात, त्याचवेळी अतिभारामुळे स्लॅब तुटून दुर्घटना घडली, असा प्राथमिक अंदाज आहे. विलेपार्ल्यातील दीक्षित रोडवर ही अनेक वर्ष जुनी विहीर आहे. वर्षानुवर्षे या भागात महिला पूजेसाठी येतात.
पाहा व्हिडिओ :