भिवंडी : कल्याण-भिवंडी मार्गावरील एका वखारीत भलामोठा साप शिरल्याने तेथील कामगारांची एकच पळापळ झाली. साप शिरल्याने तासभर वखारीतील कामकाज बंद पडले होते. सर्पमित्रांनी धामण जातीच्या या सापाला पकडल्यानंतर अचानक तो टी-शर्टमध्येही घुसला. मात्र सर्पमित्रांनी पुन्हा चलाखीने त्याला नीट पकडले. आता त्याला जंगलात सोडले जाणार आहे.


नेमकी घटना काय घडली?

कल्याण–भिवंडी मार्गावरील कोनगाव परिसरातील जे. आर. निक्की नगर येथे नटूभाई पटेल यांची विष्णू नावाची लाकडाची वखार आहे. या वखारीत आज दुपारच्या सुमाराला लाकडाचा मोठा ओंडका येथील कामगार बाजूच्या लाकडाच्या थप्पीवर ठेवत असताना त्यांना भलामोठा साप दिसला. या सापाला पाहून कामगारांनी वखारीतून पळ काढला.

त्यानंतर वखारीचे मालक नटूभाई यांना वखारीत मोठा साप शिरल्याची माहिती येथील कामगारांनी दिली. त्यांनी सर्पमित्रांचा नंबर त्यांच्या मित्राकडून घेवून त्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना कॉल करून साप शिरल्याची माहिती दिली. या मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने सर्पमित्राला घटनास्थळी पोहचण्यासाठी अर्धातास लागला. तोपर्यंत एक तासापासून वखारीतील कामकाज सापाच्या भीतीने कामगारांनी बंद ठेवले होते.

सर्पमित्र बोंबे यांनी वखारीत लाकडाच्या थप्पीच्या मागे अडगळीत लपून बसलेल्या या भल्यामोठ्या सापाला 10 ते 15 मिनिटांत पकडले. मात्र हा साप चपळ असल्याने तो थेट सर्पमित्रांच्या टीशर्टमध्येच शिरला होता. त्यानंतर या सापाला पकडून एका कापडी पिशवीत बंद केल्याने वखार मालकासह कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.

या वखारीच्या मागे शेती व जंगल परिसर असून झाडीझुडुपेही मोठ्या प्रमाणात आहेत. कदाचित हा साप भक्ष्य शोधण्यासाठी रात्रीच्या सुमाराला वखारीत शिरला असावा. अशी माहिती येथील कामगारांनी दिली. सर्पमित्र बोंबे यांनी पकडलेला हा साप धामण जाती असून तो सुमारे 7 फूट लांबीचा आहे. या सापाला वन अधिकाऱ्यांची परवागी घेवून जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.