बुलडाणा : भाजपच्या बीकेसीमधील महामेळाव्यासाठी 50 कोटींचा खर्च झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच, हा पैसा कुठून आणला?, असा सवालही अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.

बुलडाण्यातील शेगाव येथे आज काँग्रेसचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते.

“एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत असताना, त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि आजच्या भाजपच्या मुंबई येथील स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला जवळपास 50 कोटींचा खर्च करण्यात आला.”, अशी टीका अशोक चव्हाणांनी भाजपवर केली.

तसेच, “तो खर्च कुठून आणला? संपूर्ण खर्च नीरव मोदी आणि विजय मल्ल्यांनी दिला का?”, असे सवालही चव्हाणांनी उपस्थित केले.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने ‘व्हिजन-2019’ समोर केले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यभर शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्यानुसार आज बुलडाणा जिल्ह्यतील शेगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता शिबीर आयोजित केले होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन सपकाळ, हुसेन दलवाई यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.