कल्याण : पिसाळलेल्या कुत्र्याने अडीच वर्षीय चिमुकलीचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात घडली आहे. यात जखमी झालेल्या या मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. प्रांजली बागल असं या चिमुकलीचं नाव असून ती तिच्या आई-वडिलांसोबत प्रेमनगर टेकडी भागात राहते.
सोमवारी संध्याकाळी ती घराच्या परिसरातच खेळत असताना अचानक एक पिसाळलेला कुत्रा आला आणि प्रांजलीचं नाक धरून तिला ओढत घेऊन जाऊ लागला. ही घटना पाहून तिथून जाणाऱ्या एका महिलेनं धाव घेत प्रांजलीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली.
कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजलीचं नाक पूर्णपणे फाटलं असून तिला गंभीर इजा झाली आहे. तिच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतापजनक बाब म्हणजे या घटनेपूर्वी आणि नंतरही स्थानिकांनी वारंवार भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत उल्हासनगर महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.
मात्र उल्हासनगर महापालिका याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अखेर स्थानिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कुत्रे पकडणाऱ्या पथकाला पाचारण करून या कुत्र्याला पकडलं. गेल्या तीन दिवसांत या कुत्र्याने पाच जणांचा चावा घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.