मुंबई : मुंबई महापालिकेच्या रूग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्वसामान्य तर मेटाकुटीला आलाच आहे, पण आता चक्क नवजात बालकांच्या आरोग्याशीच आता खेळ सुरू आहे. सायन रूग्णालयातील प्रसुती विभागात चक्क झुरळांचा संचार असल्याचं समोर आलं आहे.


सायन रूग्णालयात 10 आणि 15 नंबरच्या वॉर्डमध्ये बेडपासून फरशीपर्यंत सगळीकडे झुरळ सापडत असल्याचं समोर आलं आहे. प्रसुती विभागातील झुरळांमुळे प्रसुती झाल्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी आईला बाळासाठी जागता पाहारा ठेवण्याची वेळ आली आहे. रूग्णालय प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करूनही त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही, असा आरोप रुग्णांनी केला आहे.


प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत महापालिका प्रशासनानं वेळ मारुन नेली आहे. त्यामुळे एकीकडे जगातील मोठी आरोग्य योजना भारतात सुरू झाली आहे आणि दुसरीकडे सरकारी रूग्णालयांची ही बकाल अवस्था आहे.


याच सायन रुग्णालयात धुतलेले कपडे वेळेवर न मिळल्यानं 30 ते 40 शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. पालिकेच्या सेंट्रल लाँड्रीमध्ये 83 कर्मचारी दिवसाला 16 हजार कपडे धुऊ शकतील इतकी क्षमता आहे. मात्र सध्या या लाँड्रीमध्ये केवळ 45 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाच्या अभावी कपडे धुऊन रुग्णालयाला न मिळाल्याने हा प्रकार घडला होता.