मुंबई  : मुंबईमध्ये पुन्हा एकदा क्लिनअप मार्शलकडून होणारी लूट समोर आलेली आहे. ऐरोली टोल नाक्यावर पालिकेचे क्लिन अप मार्शल वाहन चालकांकडून तब्बल तीन ते चार हजार रुपये अनधिकृतपणे उकळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी सूरज पांडे, निखिल कलकुथे, जितेंद्र दरवेशी, प्रवीण कारंडे,रोहन खराटे, दीपेश घोलप या क्लिन अप मार्शल्सला बेड्या ठोकल्या आहेत. 


हे सर्व क्लिन अप मार्शल पालिका टी विभागाचे होते. गेले काही दिवस ऐरोली टोल नाक्यावर हे क्लिन अप मार्शल वाहन चालक आणि मुख्यतः ट्रक चालक यांना अडवत. त्यांना तुम्ही मावा , गुटखा खाऊन थुंकला, मास्क नाही लावला वगैरे कारणे सांगून गाड्या थांबवत. नंतर त्यांच्याकडे टोळीने जाऊन तीन ते चार हजार उकळत असत. या बाबत एक नागरिकाने नवघर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी सापळा रचून या क्लिन अपच्या मार्शल टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र मुंबईत गेल्या काही दिवसात वारंवार क्लिन अप मार्शलची लूट समोर येत असल्याने पालिका या बाबत काय उपाय योजना करणार हे पाहणे गरजेचे आहे.


मुंबईत जागोजागी स्वच्छतेसाठी, नियमांचं पालन होत आहे ना हे पाहण्यासाठी नेमलेल्या क्लिन अप मार्शल्सच्या दिवसेंदिवस तक्रारी वाढताना दिसत आहेत. मुंबईतील जुहू चौपाटीवर काही दिवसांपूर्वी  फिरायला आलेल्या एका पर्यटकाला या क्लिनअप मार्शलने मारहाण केल्याची घटना घडली होती. या मार्शलवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं होतं.


बोगस क्लिनअप मार्शलचाही होता सुळसुळाट


मुंबईच्या रस्त्यांवर सध्या बोगस क्लिनअप मार्शलचा मोठा सुळसुळाट झाला असल्याचं देखील मागील काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.  पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर आणि गोदरेज गेटच्यामध्ये दोन सामान्य नागरिकांना लुटत असताना एबीपी माझानं समोर आणलं होतं. तसेच दोन व्यक्तींना लुटण्यापासून वाचवले तसेच या सर्व लुटीचे चित्रीकरण ही केलं होतं त्यावेळी या भामट्यांनी पळ काढला होता.