मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही (Walmik Karad) पोलिसांनी अटक केलीआहे. तसेच, न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. आता, राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासला वेग येणार आहे.
मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपरोक्त संदर्भ येथील शासन निर्णयान्वये विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर पथकात पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्याची बाब शासन विचाराधीन होती, त्यानुसार ही एसआयटी गठित करण्यात आल्याचं गृह विभागाने परिपत्रकातून म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाणे, बीड येथे गु. र. क्र. ६३७/२०२४ भा.न्या.सं., कलम १४०(१), १२६(२), ११८(१), ३२४(४) (५), १८१(२), १९१(२), १९०, १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सी.आय.डी., पुणे यांच्या अध्यक्षतेखाली "विशेष तपास पथक (SIT)" स्थापन करण्यात आले आहे. तसेच, बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील काही अधिकारी व अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
10 जणांची SIT टीम
आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली - पोलीस उपमहानिरीक्षक
अनिल गुजर - पो. उप अधीक्षक
विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
महेश विघ्ने - पो.उ.निरीक्षक
आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक
मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार/१३
चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक /१८२६
बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक/१६७३
संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई/४७१
बसवराज तेली 2010 चे IPS अधिकारी
नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर बसवराज तेली यांच्याकडे सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यातआली होती. सन 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस डॉक्टर असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावाचे सुपुत्र आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस महाराष्ट्रातील पाचोरा (जि.जळगाव) येथून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून, पुणे येथे शह उपायुक्त म्हणून काम केले. तर, सांगलीचे पोलीस अधीक्षकपदही सांभाळले होते, सध्या ते पोलीस उपमहानिरीक्षकपदावर कार्यरत आहेत.