मुंबई : मुंबईच्या पायधुनी भागातील 72 वर्षीय बिजनेसमनच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वृद्धाच्या 22 वर्षीय मेहुणीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघं आरोपी हे 22 वर्षीय तरुणीचे बालमित्र असल्याची माहिती आहे.

ड्रग्सच्या हव्यासापोटी तरुणीने आपल्याच बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. शनिवारी इक्बाल मोहम्मद शाह दरवेश यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता.

पोलिसांनी दरवेशच्या तिसऱ्या पत्नीची 22 वर्षीय बहीण राहत रशिद पठाणला मुख्य आरोपी म्हणून अटक केली. तिच्यासोबत 26 वर्षीय मुझमील मसरुर अहमद शेख आणि 28 वर्षीय मुस्तफा अहमद खान यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. शुक्रवारी रात्री 11 ते 12 च्या दरम्यान हत्या झाल्यास पोलिसांचा कयास आहे.

पायधुनीतील साई मंजिल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दरवेश एकटेच राहायचे. त्यांची तीन लग्न झाली होती. पायधुनी भागातच दरवेश यांच्या मालकीचं गेस्ट हाऊस आणि हॉटेलही होतं. राहतकडून सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली, मात्र चोरलेले पैसे त्यांनी खर्च केले.