मुंबई : 'अतिथी देवो भव' अशी शिकवण असलेल्या भारतीय संस्कृतीत पाहुण्यांना आदराचं स्थान आहे. अतुल्य भारत अभियाना अंतर्गत परदेशी पर्यटकांना न फसवण्याबाबत जाहिरात करुनही देशातील काही टॅक्सीचालक, गाईड्स, एजंट्स आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीयांची मान शरमेनं खाली
झुकवत आहेत.


 
सिंगापूरहून भारतात आलेल्या रेमंड येओ या पर्यटकाची फसवणूक 'कॅच न्यूज'ने मांडली आहे. रेमंडने वर्षभरापूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. संबंधित चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि टॅक्सी परमिट महिन्याभरासाठी रद्द करण्यात आलं.

 

कशी केली फसवणूक ?

गेल्या वर्षी 11 एप्रिलला सिंगापूरचा नागरिक असलेला येओ मुंबईत होता. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 ला जाण्यासाठी त्याने त्याच्या पंचतारांकित हॉटेलजवळ टॅक्सी पकडली. हॉटेल ते विमानतळ हे अंतर केवळ एक किलोमीटर असूनही त्यासाठी 200 रुपये
निश्चित करण्यात आले.

 
ही लूट इतक्यावर थांबली नाही. विमानतळावर उतरल्यानंतर जमिल अहमद खान नावाच्या टॅक्सीचालकाने येओकडे 500 रुपयांची मागणी केली. सामानाचं वजन अधिक असल्याचं कारण देत त्याने एक किलोमीटर अंतरासाठी ही अवाजवी मागणी केली.

 
पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत येओने मीटरनुसार भाडे घेण्यास दिलेला नकार आणि इच्छित स्थळी नेल्यानंतर केलेली अवाजवी मागणी यांचा उल्लेख केला आहे. ही भारतासाठी शरमेची बाब आहे, अशा टॅक्सीचालकांचा बंदोबस्त करा, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही त्याने दिली.

 
पीएमओने महाराष्ट्राच्या परिवहन विभागाला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. यावर्षी 28 मार्चला म्हणजे तब्बल वर्षभरानंतर पत्र मिळाल्यावर टॅक्सीचालकाचा शोध सुरु झाला. 6 एप्रिलला जमिल अहमद खानची चौकशी करण्यात आली. अखेर त्याने आपल्यावरील आरोपांची कबुली दिली. त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि टॅक्सी परमिट महिन्याभरासाठी रद्द करण्यात आलं.