मुंबई : दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. यंदा लिलावासाठी 2 किलो 421 ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे 226 दागिने ठेवण्यात आले होते.
लिलावात श्रीगणेशाच्या मूर्ती, मोदक, मुकूट, उंदीर, चेन, अंगठ्या, कंठ्या यासह विविध दागिन्यांचा समावेश होता. अनेक भक्तांनी या लिलावाला उपस्थिती लावून दागिने खरेदी केले. सिद्धिविनायकाच्या चरणी भक्त अर्पण करत असलेल्या सोन्या-चांदीच्या विविध वस्तूंचा लिलाव मंदिर न्यासातर्फे केला जातो. यंदाच्या वर्षातला हा तिसरा लिलाव होता.
या लिलावातून सिद्धिविनायक ट्रस्टला 25 ते 30 लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. जमा झालेला निधी समाजोपयोगी कामावर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे देण्यात आली.