मुंबई : मुंबईजवळील बुचर बेटावर बीपीसीएल टँकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. जवळपास 40 हून अधिक तास उलटून गेल्यानंतरही मुंबईजवळच्या बुचर म्हणजेच जवाहर द्विपावरील तेलाच्या टाकीला लागलेली आग धगधगत होती. आता ऑईल टँकला लागलेली आग आटोक्यात असली तरीही ती पूर्णपणे विझलेली नाही.


बुचर बेटावरील या केंद्रातील ज्या मुख्य टाकीला आग लागली आहे, त्यात 32 हजार मेट्रिक टन हायस्पिड डिझेल होतं. परंतु या आगीत टाकीतील डिझेल जळून खाक होत आलं आहे. आता फक्त 70 हजार लीटर डिझेल या टाकीत शिल्लक राहिलं आहे.

टाकीत उरलेलं डिझेल पूर्ण जळाल्याशिवाय ही आग पूर्णपणे विझवता येणार नाही. ही आग विझवण्यासाठी आणखी 10 ते 12 तास लागणार आहेत. तसंच ही आग लागलेली टाकी समुद्राच्या दिशेनं झुकल्याचीही माहिती मिळते आहे.