मुंबई : जवळपास 40 तास उलटून गेल्यानंतरही मुंबईजवळच्या बुचर म्हणजेच जवाहर द्विपावरील तेलाच्या टाकीला लागलेली आग अजूनही सुरुच आहे. आग लागलेल्या टाकीत अजून सत्तर हजार लिटर डिझेल शिल्लक आहे. त्यामुळे आग आटोक्यात येण्यासाठी अजून दहा ते बारा तास लागू शकतात.


आगीमुळे जवळपास 235 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास बीपीसीएल कंपनीच्या मालकीच्या तेलाच्या टाकीला आग लागली. तेव्हापासून भरसमुद्रात हे अग्नीतांडव सुरूच आहे.



ज्या टाकीला आग लागली, त्यात 32 हजार मेट्रिक टन हायस्पीड डिझेल आहेत. जवाहर द्वीप हे घारापुरी लेण्यांजवळ असून ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचं आहे. तेलाचा साठा करण्यासाठी हे द्वीप विविध कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यात आलं आहे.



आग लागलेल्या टाकीमध्ये सध्या साडे तीन मिटर म्हणजे सत्तर हजार लिटर डिझेल आहे. संपूर्ण डिझेल जळण्यासाठी दहा ते बारा तास लागू शकतात. तरीही आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आली नाही तर समुद्रात भीषण परिस्थिती तयार होऊ शकते.