मुंबई : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे. अधिकार नसताना महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याचं पत्र राऊळ यांनी लिहिलं आहे.

मतदारसंघातील आमची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा दावा शुभा राऊळ यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आपल्यावर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नसल्याचं राऊळ यांनी पत्रात म्हटलं आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन करुन एका उद्यानाचं उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ, नगरसेविका शीतल म्हात्रे, स्वीकृत नगरसेवक अवकाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेचेच नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी तिघा नगरसेवकांविरोधात निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बोरीवलीतील एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

दहिसरच्या एलआयसी कॉलनीत एक खासगी उद्यान पालिकेने ताब्यात घेतलं आहे. या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यासाठी माजी महापौर, नगरसेविका शुभा राऊळ, शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांचा नगरसेवक निधी, तर आमदार रामदास कदम यांचा आमदार निधी वापरण्यात आला.

कर्मयोग उद्यान नावाने हे सर्वश्रुत आहे. या उद्यानाचं 10 जानेवारीला उद्घाटन झालं. मात्र आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही दिवसांनी, म्हणजेच 14 जानेवारीला मकरसंक्रांतीचं औचित्य साधून या परिसरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी कर्मयोग उद्यानात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

घोसाळकरांनी करुन दाखवलं, शिवसेनेच्या तीन नगरसेवकांवर गुन्हा!


या कार्यक्रमाला शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा या सर्व प्रकाराला आक्षेप होता.  आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमात कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलं, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केला होता.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्यानाचे उद्घाटन झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली होती.