मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवर शिवसेना-भाजपमध्ये संर्घष पेटण्याची चिन्हं आहेत. कारण शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्याच (मंगळवार) श्रीनिवास वनगा आपला अर्ज देखील भरणार आहेत. फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना अज्ञातस्थळी ठेवलं आहे.
दरम्यान, भाजपनं वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत चिंतामण वनगा यांची पत्नी जयश्री, मुलगा श्रीनिवास आणि प्रफुल्ल यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला होता.
पूर्वीपासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. येत्या 28 मे रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.
दरम्यान पालघर पोटनिवडणुकीसंदर्भात सकाळपासून 'मातोश्री'वर खलबतं सुरु होती. प्रत्येक पदाधिकारी, आमदार आणि खासदाराला पोटनिवडणुकीची विभागवार जबाबदारी देण्यात आली होती.
वनगा कुटुंबीयांचा भाजपला रामराम
चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबीयांनी केला होता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलाने 3 मे रोजी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेशही केला.
भाजपकडून मन वळवण्याचा प्रयत्न
वनगा कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांशी सहमत नसल्याचं पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं. वनगांसोबत अनेक वर्षं काम केलं, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. अनेकवेळा पराभवानंतरही आम्ही पक्षाचं काम सोडलं नाही, असंही सावरा म्हणाले होते.
वनगांच्या मुलाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र अद्याप त्या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी त्याला उमेदवारी द्यायची नाही असा निर्णयच झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
वनगा कुटुंबाला उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न
पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. त्यानंतर चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना उमेदवारी : सूत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2018 09:04 PM (IST)
शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -