ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर, आता त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी आज ठाण्यातील शिळफाटा भागात असलेल्या बुलेट ट्रेनच्या जागेची मोजणी बंद पाडली.


शिळफाट्याजवळील शिळ गावात बुलेट ट्रेनची मोजणी सुरु होती. परंतु मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी मोजणी उधळली. आंदोलकांनी मोजणीची मशीनही फेकली.

या प्रकारानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडला. मोजणीच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु बंदोबस्त झुगारुन मनसेचं आंदोलन केलं.

"आम्हाला बुलेट नको, रोजगार हवा. आता फक्त मोजणी बंद पाडली आहे, यापुढे गनिमी कावा करुन बुलेट ट्रेनच्या मोजणीचा प्रयत्न हाणून पाडू," असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

दरम्यान, मनसेच्या आंदोलनानंतर दीड तास थांबलेली जमिनीची मोजणी शासकीय यंत्रणेने पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यंत्रणेने मात्र काम सुरु ठेवण्याची भूमिका घेतल्याने आंदोलन वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथक, एसआरपीएफला पाचारण करण्यात आलं आहे. तर मनसेचीही कार्यकर्ते जमवण्याची तयारी सुरु आहे.