शिवसेनेचा टॅब बोगस, काहींना स्क्रॅच तर काहींना डिसप्लेच नाही!
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2016 10:25 AM (IST)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेची महत्त्वाकांक्षी टॅब योजना सलग दुसऱ्या वर्षीही हँग झाली आहे. वाटप केलेले टॅब बोगस निघाले आहेत. काहींना स्क्रॅच पडले आहेत, तर काहींना डिसप्लेच नाही. मागील वर्षी प्रथमच आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे टॅब देण्यात आलेले होते. वह्या पुस्तकांनी भरलेलं दप्तर वाहण्यापेक्षा अभ्यासाची सगळी पुस्तकं असलेला हा टॅब उशीरा का होईना पण विद्यार्थ्यांच्या हातात आला. मात्र त्यातील बरेच टॅब बंद पडले आहेत. अभ्यासक्रम डाऊनलोड केलेलं 32 GB मेमरी कार्ड काढून त्याजागी 2 GB, 4 GB चं बनावट मेमरी कार्ड टाकण्यात आलं आहे. पालिकेच्या 143 शाळांमधून अशी सुमारे 715 बनावट मेमरी कार्ड गोळा झाली आहेत. यंदा आठवीची विद्यार्थीसंख्या 21 हजार आहे, तर टॅब वाटले फक्त 13 हजार, तसंच आठवीतून नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षाचे टॅब तर मिळाले, पण त्यात नव्या अभ्यासक्रमाच्या मेमरी कार्डचा पत्ता नाही. शिवाय टॅब हँग होणे आणि चार्जिंगचा प्रश्नही आहेच. पण, आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेची दवंडी पिटणाऱ्या शिवसेनेला टॅबबाबतच्या या सगळ्या तक्रारी नामंजूर आहेत. एकीकडे रस्ते, नाले, खड्डे आणि आता टॅब, या योजनांमधला गोंधळ सावरणं शिवसेनेला आता जवळपास मुश्किल झालं आहे. मात्र मुंबईकरांच्या मूलभूत सोईसुविधांचा बोजवारा उडाला असताना, मुंबई मनपा शाळांची दूरवस्था झाली असताना, आपल्या पाल्याच्या हातातला हा टॅब मुंबईकरांना समाधान मिळवून देईल?, हे आगामी निवडणुकीपर्यंत कळेलच. पाहा व्हिडीओ