मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठरावावरुन शिवसेनेने 'सामना'तून थेट मुख्यमंत्र्यांवर वार केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमता आदर करावा, असं म्हणत, तुकाराम मुंढेंवरील अविश्वास ठराव तातडीने मंजूर करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला शिवसेनेने दिला आहे.

तुकाराम मुंढेंविरोधात 104 तर बाजूने 6 मतं पडली आहेत. त्यामुळे लोकशाहीत बहुमताला किंमत असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल, असं 'सामना'त म्हटलं आहे.

'सामना'तील काही भाग जसाच्या तसा

नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. मुंढे यांच्या विरोधात १०४ तर बाजूने फक्त ६ मते पडली. लोकशाहीत बहुमताला किंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी एकमुखाने मुंढे यांच्या विरोधात उभे ठाकले असतील तर सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल. भारतीय जनता पक्षाच्या फक्त सहा नगरसेवकांना मतदानाचे स्वातंत्र्य दिले असते तर त्यांनीही मुंढेविरोधाचा षटकार ठोकलाच असता. राज्य ग्रामपंचायतीचे असो नाही तर विधानसभा आणि लोकसभेचे, ते बहुमतावरच चालते. तुकाराम मुंढे हे धडाडीचे किंवा प्रामाणिक, सचोटीचे असतीलही, पण राज्यात आणि देशात तेच एकमेव सचोटीचे आहेत असे सांगणे हा इतर प्रामाणिक अधिकार्‍यांचा अपमान आहे.

मुंढे यांनी नवी मुंबईकरांच्या हिताची अनेक कामे तडाखेबंद पद्धतीने केली असेही सांगितले जात आहे. महापालिका आयुक्त या नात्याने त्यांनी काही कामे केलीही असतील, पण याचा अर्थ लोकशाही मार्गाने निवडून आलेले नगरसेवक जनहिताची कामे धडाडीने करीत नाहीत असे कसे म्हणता येईल? शिवाय मुंढे यांनी जी काही कामे केली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सर्व पक्षीय नगरसेवकांचे जे आरोप आहेत, त्यांच्या वर्तणुकीसंदर्भात जे आक्षेप आहेत ते चुकीचे कसे ठरतात? मुंढे यांनी गेल्या पाच महिन्यांत शुभारंभाचे नारळ फोडून १५ रुपयांच्याही कामांचा शुभारंभ झाला नाही, फेरीवाले, प्रकल्पग्रस्तांवर अन्यायकारक कारवाई केली, मनमानी कारभार करून लोकप्रतिनिधींना डावलले असे अनेक आक्षेप मुंढेविरोधात स्थानिक नगरसेवकांनी घेतले आहेत. त्यांचेही उत्तर मुंढे यांनी द्यायला हवे. खरे तर मुंढे जेथे गेले तेथे त्यांच्यावर अशी वेळ आली. त्यामुळे त्यांनीच या गोष्टीचे आत्मपरीक्षण करायला हवे. एखाद्या ‘डॉन’ किंवा ‘रॉबिनहुड’प्रमाणे वागून लोकप्रियता मिळविल्यानेच अधिकारी चांगला ठरतो असे नाही. ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त जयस्वाल हे कोणताही गाजावाजा न करता काम उत्तम व धडाकेबाज पद्धतीने करीत आहेत. तेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्याच खास मर्जीतले असल्याची बातमी आहे. मुंढेही मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतलेच असल्याचे बोलले जाते, पण मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आहोत म्हणून कसेही वागण्याचा व मनमानी करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो व त्याने घटना व कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचे असते. लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या काढून त्यांना अडचणीत आणायचे व स्वत:चा धडाकेबाजपणा सिद्ध करायचा हे योग्य नाही. स्वत: मुख्यमंत्री विरोधकांशी विनम्रतेने वागतात व तेवढा संयम हा ठेवायलाच हवा.

संबंधित बातम्या

आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे