मुंबई: अड्डे-बिड्डे शिवसेना करत नाही, जे खड्डे करतात, त्यांना (सोमय्या) खड्ड्यात कसं घालायचं हे शिवसेनेला माहित आहे, असं प्रत्युत्तर मुंबई मनपातील शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.

मुंबई पालिकेतील शिवसेनेचं आणि एका कुटुंबाचं माफियाराज असलेले अड्डे उद्ध्वस्त करु, असं भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितलं. इतकंच नाही तर येत्या निवडणुकीत भाजप मुंबई पालिकेतील सर्वच्या सर्व 227 जागा लढवणार असल्याची घोषणाही सोमय्यांनी केली.

त्याला उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणल्या, "अड्डे वगैरे शिवसेना करत नाही, ते त्यांनाच माहित असतील. यांना खड्ड्यात कसं टाकायचं हे आम्हाला चांगलं माहित आहे. स्वबळावर लढण्याबाबतची घोषणा आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. यांच्यासारखं (सोमय्या) कोणीही उठून बोलत नाही".

मुंबई महापालिका भाजप स्वबळावर लढणार, सोमय्यांचा गौप्यस्फोट

मुंबकरांना गृहित धरतात


आम्ही मुंबईकरांना गृहित धरत नाही, तर जिंकण्यासाठी कामं करतो. हे मुंबईकरांना गृहित धरत आहेत. काहीही चाललं तरी मुंबईकर खपवून घेतील असं यांना वाटतं. आम्ही मुंबईकरांच्या बरोबरीने आहोत, असं पेडणेकर म्हणाल्या.

म्हणून ठाकरे कुटुंबावर मुंबईकरांचा विश्वास


मुंबईवर अनेक हल्ले झाले, मुंबईतील कांड मुंबईकर विसरलेले नाहीत. त्यामुळेच मुंबईकरांचा ठाकरे कुटुंबावर विश्वास आहे. आमचे नगरसेवक कामं करतात, यांच्यासारख्या वल्गना करत नाहीत

उद्धव ठाकरेंवर मुंबईकरांचा आणि महाराष्ट्राचा विश्वास आहे. त्यामुळेच कोणाचाही पाठिंबा नसताना 63 आमदार एकहाती निवडून आणले, असं पेडणेकर यांनी सांगितलं.