मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचं माफियाराज मोडित काढण्यासाठी मुंबई पालिकेतील सर्वच्या सर्व 227 जागा लढवणार असल्याचं सोमय्यांनी सांगितले. यावेळी सोमय्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरही घणाघात केला. फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेसाठी निवडणुका होणार आहेत.
मुंबई महापालिका स्वबळावर लढणार - सोमय्या
"मुंबई महापालिका स्वबळावर लढून शिवसेनेचं माफियाराज संपवणार आहोत. भाजप आपल्या छोट्या मित्रपक्षांच्या मदतीने सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा स्वबळावर लढून बहुमताने निवडून येईल.", असा विश्वास खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
"मुंबई महापालिकेला शिवसेनेने माफिया अड्डा बनवलाय"
खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर जोरदार घणाघात केला. "मुंबई महापालिकेला शिवसेना आणि एकाच कुटुंबाने माफियांचा अड्डा बनवला आहे. तो अड्डा आम्ही समाप्त करणार आहोत.", अशी टीका सोमय्या यांनी शिवसेनेसह ठाकरे कुटुंबावर केली.
सोमय्यांची भूमिका अधिकृत नाही : सूत्र
खासदार किरीट सोमय्या यांनी मांडलेली भूमिका भाजपची अधिकृत भूमिका नाही, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. त्यामुळे निवडणुकीआधी युती न करता जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेत निवडणुकीनंतर बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न असू शकतो.