मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2017 05:34 PM (IST)
मंजुळा शेट्टये हत्येप्रकरणी सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव आहे. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलं आहे. मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपपत्र दाखल केलं.
मुंबई : भायखळा कारागृहातील कैद्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी, पोलिसांनी अखेर आरोपपत्र दाखल केलं. 4 हजार पानी आरोपपत्रात कारागृह अधीक्षक मनिषा पोखरकरसह एकूण सहा कारागृह कर्मचाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल करताना भायखळा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आलं. ज्यात मंजुळाचे केस पकडून तिला ओढून नेताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपपत्रात इंद्राणी मुखर्जी आणि मरियम यांची साक्ष देखील महत्त्वाची मानण्यात आली. आता या प्रकरणातील आरोपींवरचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणा किती तत्परता दाखवते हे पाहावं लागेल. काय आहे नेमकं प्रकरण? भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.