नवी मुंबई : येत्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला. त्यामुळे युतीसाठी गोंजारण्याचे भाजपचे सर्व प्रयत्न फोल गेल्याचं दिसत आहे. आधी फक्त 'भाजप'ची भाषा बोलणाऱ्यांना आता मित्र आठवले, असा टोलाही सुभाष देसाई यांनी लगावला.


सहा महिन्यांपूर्वी, फक्त भाजपचे सरकार येणार, अशी त्यांची भाषा होती. कालच्या भाषणात मात्र 2019 ला एनडीएचे सरकार येणार, असं त्यांना बोलावं लागलं. याचा अर्थ त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. राज्यातील नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रत भगवा फडकवणार. शिवसैनिकांनी स्वबळासाठी कामाला लागावे, असे आदेश सुभाष देसाई यांनी दिले.

शिवसेनेला अपशकुन करणाऱ्यांची हालत खराब झाली. छगन भुजबळ तुरुंगात, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झाले, तर गणेश नाईक घरी बसले. राज्यसभेत हिंदी आणि इंग्रजीत बोलावे लागते. त्यामुळे नारायण राणेंना ते शिकायलाच सहा वर्ष निघून जातील. तोपर्यंत त्यांना जनता विसरली असेल. यांची अवस्था पाहून शिवसेना सोडण्याचे कोणी धाडस करणार नाही. कारण ती राजकीय आत्महत्या असेल, अशी टीका सुभाष देसाई यांनी केली.

लोकल रेल्वे प्रवासात महिलांवर हल्ले होत आहेत. हे प्रसंग वाढले आहेत. हे प्रसंग रोखण्यासाठी शिवसेना दक्षता पथक तयार करणार आहे. नागरिकांना, प्रवाशांना शिवसेनाच संरक्षण देऊ शकते, असंही सुभाष देसाई म्हणाले.